“सह्याद्रीचा विनाश, एमएमआरचा डाव आणि महावितरणच्या खाजगीकरणावर सरकारला थेट १० सवाल!”
कर्जत: महाराष्ट्रात सुरू असलेल्या अंदाधुंद जंगलतोड, खाजगी प्रकल्प आणि राज्याच्या सत्तेवर दिल्लीतून चालणाऱ्या हुकूमशाही विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जत येथील सभेतून अत्यंत आक्रमक आणि आंदोळित करणारा हल्लाबोल केला. सभेच्या सुरुवातीलाच प्रशासनाकडून इंटरनेट सेवा बंद करण्याच्या प्रकारावर ताशेरे ओढत त्यांनी उपरोधाने म्हटले की, “इथे इंटरनेट बंद केले म्हणे… अहो, इंटरनेट बंद जरी केलं, तर काय सूर्य उगवायचा थांबतो काय? संपूर्ण जग हे बघतंय, पण कोणत्या जगात ही माणसं जगतात मला कळत नाही.” मनात काळे असले की अशा गोष्टी कराव्या लागतात, जर मन स्वच्छ असतं, तर अशी वेळ आली नसती, असे ते म्हणाले.
जंगलतोडीवर आणि निसर्गाच्या विनाशावर तीव्र संताप
सकाळी स्वतः प्रत्यक्ष जंगलात जाऊन तोडलेल्या झाडांची रचना पाहिल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले, “ती झाडांची लाकळं बघताना मला असं वाटलं की मी जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय. इतक्या वर्षांची जुनी झाडं कोणत्यातरी गुजरात्यासाठी म्हणून कापून टाकावी लागतायत. या प्रकल्पाची नेमकी काय गरज आहे?” ग्रामपंचायतीने झाडं कापण्यासंदर्भात ठराव करून विरोध दर्शवला असला, तरी सरकारला त्याची काहीही पर्वा नाही. झाडं तोडल्यावर तिथल्या पक्षांची घरटी उध्वस्त होतात, उद्या अशीच वेळ महाराष्ट्रातील सामान्य जनतेवर येऊन हीच मंडळी तुम्हाला ‘गेट आउट’ म्हणतील, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.
केंद्रातील दोन नेत्यांवर आणि राज्यकर्त्यांवर गंभीर आरोप
राज्यामध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केंद्रासमोर कोणतीही किंमत उरलेली नाही. “हे सगळं वरती ठरतं. मी विधानसभेच्या वेळेला सतत सांगत होतो की हा महाराष्ट्र जर यांच्या हातात गेला, तर तो महाराष्ट्राच्या हातात राहणार नाही, तर दोन माणसांच्या हातात जाईल आणि हे वाटेल ते करतील. गुजरात मधली दोन माणसं महाराजांचा महाराष्ट्र चालवणार आणि आमचा सह्याद्री पोखरून काढणार, हे चालणार नाही!” अशी डरकाळी त्यांनी फोडली.
एमएमआर (MMR) रीजन आणि मुंबईला तोडण्याचा डाव
या सर्व प्रकल्पांमागे एक मोठा दीर्घकालीन (Long-term) प्लॅन असल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले की, उद्योगपतींचे आणि सरकारचे लक्ष फक्त एमएमआर (MMR – Mumbai Metropolitan Region) रिजनवर आहे. त्यांच्या डोक्यात मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करून गुजरातला जोडण्याचा जुना डाव आहे. म्हणूनच या संपूर्ण परिसराचा ताबा घेऊन तिथे वीज वाढवणे, सोसायट्या उभ्या करणे आणि बिल्डरमार्फत जमिनी खरेदी करून राजकीय व भौगोलिक वर्चस्व निर्माण करण्याचा हा कट सुरू आहे.
मुख्यमंत्री आणि सरकारला थेट ‘१० प्रश्न’
लोकसत्ता वृत्तपत्रातील मुख्यमंत्र्यांच्या लेखाचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी सरकारला थेट १० मोठे प्रश्न विचारले आहेत:
पंप स्टोरेज प्रकल्पांबाबत केलेले करार, १३,५०० मेगावाट वीज आणि ७१,००० कोटींच्या गुंतवणुकीचा सविस्तर तपशील सरकारने जाहीर करावा.
महाराष्ट्राची सध्याची विजेची गरज ३०,००० मेगावाट असताना आणखी १३,००० मेगावाटची अतिरिक्त गरज कशासाठी आहे?
जगभरात डेटा सेंटर्सना विरोध होत असताना महाराष्ट्रात हा अट्टहास का आणि किती डेटा सेंटर्स येणार आहेत?
भीमाशंकर व कर्जतची जंगले तोडल्याशिवाय सरकारकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता का?
या प्रकल्पांची चर्चा स्थानिक ग्रामसभेत, पेसा (Pesa) कायद्यानुसार झाली होती का? त्याचे सर्व तपशील मराठीत उपलब्ध होते का?
महावितरणचा आयपीओ (IPO) आणि वीज वितरणाचा खाजगीकरण घाट
राज ठाकरेंनी अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला की, येत्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्र सरकार महावितरणचा आयपीओ आणत आहे. याचा अर्थ भविष्यात महाराष्ट्रातील संपूर्ण वीज वितरण (मुंबईसह शहरे व तालुके) खाजगी कंपन्यांच्या व उद्योगपती मित्रांच्या हातात दिले जाईल. उद्या वीज बिल भरले नाही तर सामान्यांच्या घराची वीज कापण्याचा अधिकारही खाजगी कंपनीकडे जाईल, असा गंभीर आक्षेप त्यांनी घेतला.
‘लाडकी बहीण’ योजना आणि मतदारांवर ताशेरे
महिलांना मिळणाऱ्या लाडक्या बहीण योजनेच्या दीड हजार रुपयांवर भाष्य करताना ते म्हणाले, “या दड हजार रुपयांमध्ये तुम्हाला विकत घेतलं जातंय, तुमची तोंडं बंद केली जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर जाती-धर्माच्या नावावर किंवा पैसे घेऊन मतदान करायचं आणि मग पुढची पाच वर्षे बोमलायचं, हेच सगळं राजकारण आपल्या चुकीच्या मतदानामुळे चाललंय.”
सह्याद्रीतील प्रकल्पांची यादी व डेटा सेंटरचा घाट
महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत तब्बल २३ मोठे प्रकल्प येत असून, यात अदानी हायड्रो, रिन्यू हायड्रो पॉवर, जेएसडब्ल्यू, टाटा, टॉरेंट यांसारख्या खाजगी कंपन्यांचा भरणा आहे. हे सर्व प्रकल्प येत्या काळात महाराष्ट्रात येणाऱ्या ‘डेटा सेंटर्स’साठी वीज आणि पाणी पुरवण्यासाठी आणले जात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्राचा दाखला व ऐतिहासिक संदर्भ
शिवरायांच्या काळातील ‘आज्ञापत्र’ वाचून दाखवत राज ठाकरे म्हणाले की, महाराज गडावरील आणि परिसरातील झाडे लेकरांसारखी जपायचे. “रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी वाढवली, त्या झाडांना तोडणाऱ्याच्या दुःखास पारावार काय? आणि असे काम करणाऱ्यांसह ते स्वल्पकाळात बुडून नष्ट होतील, असे शिवरायांनी लिहून ठेवले आहे.” तसेच, शिवरायांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याने सव्वाशे वर्षे हिंद प्रांतावर राज्य केले. मग आजचा मराठी माणूस आणि तरुण इतका थंड आणि लाचार का बसला आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राजकीय पक्षांवर आणि ५० खोक्यांवर भाष्य
सध्याच्या इतर राजकीय पक्षांच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी शिवसेना फुटीचा संदर्भ दिला. “तुम्हाला बोलतानाही कळलं पाहिजे आपण काय बोलतोय… ५० खोके म्हणजे ५० कोटी, आणि ४० आमदार फोडण्यासाठी २००० कोटी आले कुठून? महाराष्ट्रात चाललंय काय?” असे म्हणत त्यांनी या प्रकारांना केवळ हसण्यावारी न नेण्याचा इशारा दिला.
तरुणाईला आणि पोलिसांना आवाहन
सर्बिया देशातील विद्यार्थ्यांनी जशी हुकूमशाही सत्ता उलटवून टाकली, तसेच महाराष्ट्रातील तरुणांनी ही आता जागे होण्याची गरज आहे. तसेच पोलीस बांधवांना उद्देशून ते म्हणाले की, “सरकारच्या दबावाखाली येऊन या महाराष्ट्रासाठी लढणाऱ्यांना बडवू नका, उद्या तुमच्याही दरवाजावर ही वेळ येईल.”
“उद्योग-धंद्यांच्या विरोधात आम्ही नाही, महाराष्ट्राची प्रगती झालीच पाहिजे. पण महाराष्ट्राला कसं नाचवायचं हे बाहेरच्यांनी ठरवता कामा नये. हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे आणि तो मराठी माणसाचाच राहिला पाहिजे.” — राज ठाकरे





